एक्स्प्रेस वृत्तसेवा, मिर्जापूर

माध्यान्ह भोजनात मुलांना रोटीबरोबर नुसते मीठ दिले जात असल्यावरून टीकेचा विषय झालेल्या उत्तर प्रदेशातील मिर्जापूरमधील शिऊर येथील प्राथमिक विद्यालयाने याआधीही तोंडीलावणे म्हणून मीठ देण्याचाच पायंडा पाडल्याचे उघड होत आहे.

‘जनादेश टाइम्स’ या वृत्तपत्राचे पत्रकार पवन जयस्वाल यांनी या सरकारी प्राथमिक शाळेत मुलांना रोटीबरोबर नुसते मीठ दिले जात असल्याची चित्रफीत काढली होती. समाजमाध्यमांवर ती झळकताच त्या शाळेवर जोरदार टीका सुरू झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी जयस्वाल आणि ग्रामप्रधानाविरोधातच गुन्हा दाखल केल्याने तर संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी एडिटर्स गिल्डने केली आहे. सरकारने ही चित्रफीत प्रसारित होताच शाळा व्यवस्थापकाला तसेच पंचायत अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

मात्र शिऊरच्या या शाळेत याआधीही कधी रोटीबरोबर तर कधी भाताबरोबर नुसते मीठच दिले जात होते, असे तेथील काही विद्यार्थ्यांनी एक्स्प्रेस प्रतिनिधीला सांगितले. रुक्मिणी देवी (वय ४०) ही महिला माध्यान्ह भोजनासाठी अन्न रांधते आणि तिची मुलगीही याच शाळेत शिकते. रुक्मिणी देवीने सांगितले की, ‘‘मुलांना सातत्याने भात किंवा रोटीबरोबर मीठ द्यावे लागत होते. त्यामुळे या भोजनासाठी मिळणारा शिधा दिला जात नसल्याची  तक्रार आम्ही मुख्याध्यापक मुरारी लाल यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी आम्हाला दटावले आणि या मुलांनी काही सांगितले तरी कुणाचा विश्वास बसणार नाही, असेही सांगितले होते.’’ कैलाश (वय २७) या स्थानिकानेही या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांची मुलगीही याच शाळेत शिकते आणि तिनेही तोंडीलावणे म्हणून मीठच दिले जात असल्याचे आपल्याला सांगितल्याचे तो म्हणाला. मुख्याध्यापक मुरारी लाल यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

त्या पत्रकाराचा सत्कार करावा – तिवारी

माध्यान्ह भोजनातील धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या पत्रकाराचा राज्य सरकारने खरे तर सत्कार केला पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार आणि चित्रपट कलावंत मनोज तिवारी यांनी बुधवारी केली. या योजनेत भ्रष्टाचार होत असेल, तर दोषींवर सरकार कठोर कारवाई करील. भाजप कधीही अशा लोकांची पाठराखण करणार नाही, असेही तिवारी म्हणाले.