एखाद्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाशी मैत्री अथवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं कसं महागात पडू शकतं याचं एक उदाहरण समोर आलं आहे. पुणे जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या फेसबुक पोस्टला वकिलाने लाइक केलं, पण त्यानंतर या वकिलाचा खटला थेट दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला.

तीन वर्षांपासून एका वकिलाच्या खटल्याची सुनावणी न्यायाधीश करत होते. जमिनीच्या वादासंदर्भातला हा खटला पुणे जिल्हा न्यायालयात सुरू होता. एप्रिल २०१८मध्ये याचिकाकर्त्याच्या कुटुंबातील वकिलाने सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाच्या एका फेसबुक पोस्टला लाइक करून त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर फेसबुकवरील कमेंटचं हे प्रकरण खटल्याची सुनावणी करणाऱ्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवलं. अखेर मुख्य न्यायाधीशांनी हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग केला. ज्या न्यायाधीशाच्या कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू आहे, त्या न्यायाधीशाच्या फेसबुक पोस्टला लाइक करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं म्हणजे व्यवसायाशी केलेली प्रतारणा आहे, असं म्हणत मुख्य न्यायाधीशांनी हा खटला दुसऱ्या कोर्टात वर्ग केला हे योग्यच केलं, असं खंडपीठानं म्हटलं आहे.

खटला दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्याच्या निर्णयाला कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन, तीन वर्षांपासून सुनावणी करणारे न्यायाधीश आता यापासून पळ काढू शकत नाही असं म्हणत आव्हान दिलं होतं. या खटल्यातून वगळण्यात आलेल्या न्यायाधीशांसमोरच या खटल्याची सुनावणी करण्यात यावी असं या याचिकेत म्हटलं होतं. पण ही याचिका फेटाळण्यात आली.