बंगळूरु येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. येत्या ७ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनते आहेत, त्यामुळे माझे राष्ट्रीय पुरस्कार त्यांनाच देण्यात यावेत’ अशा शब्दांत प्रकाश राज यांनी मोदींवर सडकून टीका केली होती. मात्र, त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर आज प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात एका वकिलाने खटला दाखल केला. यावर ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर काही लोक त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत:ला फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश?,’ असे प्रकाश राज म्हणाले होते. बंगळुरू येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (DYFI) बैठकीत ते बोलत होते. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांना प्रकाश राज ३० वर्षांपासून ओळखतात.

दरम्यान, आपले पुरस्कार परत करायला मी मूर्ख नाही. ते मला माझ्या उत्कृष्ठ अभिनयासाठी मिळाले आहेत, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. ‘अच्छे दिन’वरुनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता. ‘तुमच्या अच्छे दिनांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही मला भाग पाडू शकत नाही. मी तुमच्यापेक्षा (मोदींपेक्षा) मोठा अभिनेता आहे. त्यामुळे तुम्ही नेमका कधी अभिनय करता, हे मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला काहीच माहिती नाही, असा अभिनय जेव्हा तुम्ही करता, तेव्हा त्यावर मी किंवा जनता विश्वास ठेवेल, असे तुम्हाला वाटते का?,’ असा सवालदेखील त्यांनी विचारला होता.