भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानिया विद्यापीठाचे कुलसचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये असलेल्या खासदार तेजस्वी सूर्या यांनीही उस्मानिया विद्यापीठाला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर विद्यापीठ प्रशासनानं आक्षेप घेतला आहे. हैदराबाद विद्यापाठात येण्यापूर्वी तेजस्वी सूर्या यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सूर्या यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणाच्या पोलीस महानिरीक्षकांनी याची माहिती दिली.

तेलंगणा के. चंद्रशेखर राव यांची जहागिरी नाही

तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी परवानगी न घेता उस्मानिया विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला होता. ते स्वतंत्र तेलंगणासाठी शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी जात होते. विद्यापीठात जाण्यापासून आपल्याला पोलिसांनी रोखल्याचा आरोपही सूर्या यांनी केला होता. तसेच प्रवेश करण्यास रोखल्यानंतर त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीकाही केली होती. “तेलंगणा के. चंद्रशेखर राव यांची जहागिरी नाही. तुम्हीही कितीही प्रयत्न करा, पण भाजपा युवा मोर्चाला तेलंगणासाठी शहीद झालेल्या अभिवादन करण्यापासून रोखू शकत नाहीत,” असं ते म्हणाले होते. दरम्यान, सूर्या यांना विद्यापीठात जाण्यापासून रोखल्याचा आरोप हैदराबादच्या पोलीस उपायुक्तांनी फेटाळून लावला होता.