अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय अशा संरक्षणविषयक माहितीचे पाकिस्तानकडे हस्तांतरण केल्याचा आरोप ठेवीत भारतीय नौदल अधिकाऱ्याविरोधात दिल्ली न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने पाकिस्तानी लष्कराशी, गुप्तचर संस्थांशी संधान बांधल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. येत्या १५ मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
‘ऑफिसर सिक्रेट अ‍ॅक्ट’ या कायद्याचा भंग केल्याचा आरोप चांद कुमार प्रसाद या नौदल अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम १२० अन्वये त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दया प्रकाश यांनी ही माहिती दिली.
प्रसाद याला २०१० मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली होती. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला १४ वर्षे कारावासाची शिक्षाही होऊ शकते. आरोपपत्र, आरोपीकडून जमा करण्यात आलेल्या वस्तू आणि प्रसाद याची जबानी यावरून त्याच्यावर ठेवण्यात आलेला हेरगिरीचा ठपका प्रथम दर्शनी तरी योग्य वाटत असल्यानेच त्याच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रसाद याची गेली चार वर्षे चौकशी सुरू होती. अखेर त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.