मागच्या काही दिवसांपासून देशात निर्माण झालेली चलन तुटवडयाची स्थिती आता सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत. ८६ टक्के एटीएम मशीन्स व्यवस्थित कार्यरत आहेत. ज्या भागांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा निर्माण झाला होता तिथे नोटा पोहोचवण्यात आल्या आहेत तसेच सरकारी प्रेसमध्ये दिवस-रात्र नोटांच्या छपाईचे काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मागच्या काही दिवसात देशाच्या वेगवेगळया राज्यांमध्ये नोटाबंदी सारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले होते. रोकड नसल्याने एटीएम मशीन्सवर लागलेले नो कॅशचे फलक आणि ज्या एटीएममध्ये पैसे आहेत तिथे लोकांच्या लांबच लांब लागेल्या रांगा असे चित्र देशाच्या काही राज्यांमध्ये दिसत होते. अशी स्थिती २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर निर्माण झाली होती.  एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी शुक्रवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आलेली असेल असे सांगितले.

एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. चलन तुटवडयाची ही स्थिती सर्वत्र निर्माण झालेली नाही. देशातील काही भागामध्ये ही समस्या आहे. जिथे रोख रक्कमेची टंचाई आहे तिथे कॅश पाठवण्यात आली आहे. उद्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आलेली असेल असे रजनीश कुमार यांनी सांगितले.

पाचशेच्या नोटांचा उतारा

देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला असतानाच केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशात पाचशेच्या नोटांची छपाई पाच पटींनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अर्थखात्याचे सचिव एस सी गर्ग यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चलन तुटवड्याबाबत माहिती दिली. सध्या दररोज ५०० कोटी पाचशेच्या नोटा छापल्या जातात. आगामी काळात यात पाच पटींनी वाढ केली जाणार असून आगामी काळात दररोज पाचशेच्या अडीच हजार कोटी नोटा छापल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यानुसार महिनाभरात जवळपास ७० ते ७५ हजार कोटी नोटा छापल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.