लाच घेताना अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. तहसीलदाराला लाच घेताना एसीबीच्या पथकानं अटक रंगेहाथ पकडलं. ही घटना मोठी नाही. मोठी गोष्ट तहसीलदाराने लाचपोटी मागितलेली रक्कम. जमिनीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तहसीलदारानं १.१ कोटींची लाच मागितली होती. तहसीलदाराला अटक केल्यानंतर एसीबीनं तब्बल दोन दिवस तहसीलदाराच्या घरावर छापेमारी केली. त्यात मोठं घबाड हाताला लागलं आहे.

एसीबीच्या पथकानं शुक्रवारी तहसीलदार एर्वा बलराजू नागराज यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. नागराज हे हैदराबादपासून जवळच असलेल्या मेडचल मल्कजगिरी जिल्ह्यातील किसारा तालुक्याचे तहसीलदार आहेत. नागराज यांनी श्री स्य डेव्हलपर्सचे रिअल इस्टेट डीलर चौला श्रीनाथ यादव यांच्याकडे १ कोटी १० लाखांची लाच मागितली होती. किसारा तालुक्यातील रामपल्ली दियारा गावातील १९ एकर जमिनीसंदर्भातील समस्या निकाली काढण्यासाठी नागराज यांनी ही लाच मागितली होती.

याप्रकरणी तहसीलदार नागराज, रिअल इस्टेट डीलर अंजी रेड्डी यांच्यासह चौघांविरुद्धात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान, एसीबीनं याप्रकरणानंतर नागराज यांच्या घरावर दोन दिवस धाडी टाकल्या. यात घरात आणि गाडीत लपवून ठेवलेली मोठी रक्कम मिळाली आहे. ३६ लाख रुपये रोख आणि अर्धा किलो सोनं एसीबीच्या पथकानं जप्त केलं आहे.

दरम्यान, याप्रकरणाचा तपास करत असताना एसीबीच्या हाती काही कागदपत्रं लागली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या दस्तऐवजामध्ये एका खासदाराच्या एमपीएलएडी फंडाशी संबंधित कागद आढळून आल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.