राज्यात समुद्रकिनाऱ्यावर असलेले कॅसिनो बंद करण्यात येणार नाहीत, मात्र ते मांडवी नदीच्या परिसरातून अन्यत्र हलविण्यात येतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत स्पष्ट केले.
समुद्रकिनाऱ्यावर असलेले कॅसिनो बंद केले जातील, असे वक्तव्य आपण कधीही केलेले नाही, आपण केवळ ते मांडवी नदीच्या परिसरातून अन्यत्र हलविणार आहोत, असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले. मांडवी नदीच्या परिसरात असलेले सर्व कॅसिनो येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने अन्यत्र हलविण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
समुद्रकिनाऱ्यावरील हॉर्सशू या कॅसिनो जहाजाच्या परवान्याचे नूतनीकरण सरकारने कसे केले, असा सवाल काँग्रेसचे आमदार अ‍ॅलेक्सिओ रेजिनाल्ड यांनी उपस्थित केला. मोठय़ा आकाराच्या जहाजाला त्याच परवान्यावर कॅसिनो सुरू ठेवण्याची परवानगी कशी देण्यात आली, असेही ते म्हणाले. तथापि, परवाना देताना जहाजाचा आकार नियमात स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता नवे नियम तयार केले जात असून त्यावर क्षमतेनुसार शुल्क आकारण्यात येणार आहे, असे पर्रिकर म्हणाले.