जगभरात फैलाव झालेल्या ‘करोना व्हायरस’चा आता पाळीव प्राण्यांमध्येही शिरकाव झालाय. हाँगकाँगमध्ये दोन श्वानांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर, आता बेल्जियममध्ये एका मांजरीला करोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त आलं आहे. मांजरीला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. बेल्जियमच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या मांजरीला तिच्या मालकीणीकडून करोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मानवातून प्राण्यामध्ये व्हायरसचा प्रसार झाल्याची दाट शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे.

बेल्जियमच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी मांजरीच्या मालकिणीला करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. एका आठवड्यानंतर मांजरीलाही व्हायरसची लागण झाली आहे. मांजरीला डायरिया झाला होता आणि ती सतत उलटी करत होती. तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अधिकाऱ्यांनी त्या महिलेची ओळख मात्र सांगितली नाही. पण, ती महिला बेल्जियमच्या लीग (Liège) शहरातील असल्याची माहिती आहे.

यापूर्वी, हाँगकाँगमध्ये कुत्र्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हाँगकाँगमध्ये एका १७ वर्षाच्या पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला करोनाच्या संशयावरुन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते. १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी सोडून देण्यात आले. पण, सूटका झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कुत्र्याच्या ६० वर्षीय मालकिणीलाही करोनाने ग्रासले होते. त्यानंतर येथे एका दोन वर्षाच्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानालाही करोनाची लागण झाली आहे.