आहारसवयींच्या अभ्यासातील निष्कर्ष

ऑस्ट्रेलियात किमान १० लाख पक्षी मांजरी रोज फस्त करतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. बेवारस सोडून दिलेल्या मांजरी पक्ष्यांचीही शिकार करतात. पाळीव मांजरी दरवर्षी ६१ दशलक्ष तर बेवारस मांजरी ३१६ दशलक्ष पक्षी मारून खातात, अशी ऑस्ट्रेलियातील ही दरवर्षीची आकडेवारी सांगते.

देशातील मांजरींबाबत करण्यात आलेल्या एकूण १०० अभ्यासांमधून ही माहिती पुढे आली आहे. मांजरींच्या आहारसवयींचे शंभर अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचाही आधार यात घेण्यात आला आहे. ‘जर्नल बायोलॉजिकल कन्झर्वेशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध  झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे, की मागील अभ्यासांमध्ये ऑस्ट्रेलियातील मांजरींचा सस्तन प्राण्यांवर झालेला परिणाम हा मुख्य विषय होता. मांजरींचा पक्ष्यांवर झालेला परिणाम प्रथमच सखोलपणे अभ्यासण्यात आला आहे. मांजरी पक्षी मारून खातात हे सर्वानाच माहिती आहे पण त्यांच्या या शिकारी बाण्याने पक्ष्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत, असे ऑस्ट्रेलियातील चार्लस डार्विन विद्यापीठातील वोइनारस्की यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियात मांजरींनी पक्ष्यांची शिकार करण्याचे प्रमाण बेटे व ओसाड भागात अधिक असून तेथे चौरस किलोमीटरला ३३० पक्षी मांजरींकडून फस्त केले जातात. मांजरी ऑस्ट्रेलियातील देशी पक्ष्यांच्या ३३८ प्रजाती मारून खातात. त्यातील ७१ प्रजाती धोक्यातील आहेत. मध्यम आकाराचे पक्षी, जमिनीवर घरटे बांधून तेथेच अन्नपाणी करणारे पक्षी हे मांजरींकडून मारून खाल्ले जातात. ऑस्ट्रेलियातील पक्ष्यांना मांजरींचा आधीपासूनच धोका आहे.

काही वेळा पाळीव मांजरीही पक्षी मारून खातात पण पाळीव प्राणी मालकांनी यात लक्ष घातले तर ही समस्या सोडवता येईल, असे ऑस्ट्रेलियातील धोक्याच्या प्रजातींच्या संदर्भातील आयुक्त सेबास्टियन लँग यांनी सांगितले.