स्तनदा माता, गर्भवती महिला व ताप असलेल्या व्यक्ती यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये, असा सल्लावजा इशारा भारत बायोटेक या कंपनीने दिला आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादेतील या कंपनीने तयार केली असून तिला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांआधीच मान्यता देण्यात आली होती.

लशीबाबतच्या स्पष्टीकरण पत्रात कंपनीने संकेतस्थळावर म्हटले आहे की, या लशीची नैदानिक परिणामकारकता अजून सिद्ध झालेली नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून ही लस घेतल्यानंतर कोविड १९ विषाणूविरोधातील प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे लागणार आहे. अ‍ॅलर्जी म्हणजे एखाद्या घटकाचे वावडे असेल तर ही लस घेता येणार नाही, ज्यांना खूप ताप असेल. रक्तस्राव होत असेल, जे लोक रक्त पातळ ठेवण्याची औषधे घेत असतील त्यांनी ही लस घेऊ नये. प्रतिकारशक्ती अगदीच कमी असलेले लोक, गर्भवती महिला, स्तनदा माता यांनी लस घेऊ नये. लस घेताना संबंधितांनी लस देणाऱ्या यंत्रणेला त्यांच्या आरोग्याची व वैद्यकीय स्थितीची कल्पना देण्याची गरजही भारत बायोटेक कंपनीने प्रतिपादन केली आहे.

सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून कोव्हॅक्सिन लशीच्या दोन मात्रा चार आठवडय़ांच्या अंतराने द्यायच्या आहेत. कोव्हॅक्सि लशीला मर्यादित वापरासाठी आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे. लशीला परवानगी देताना त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या झालेल्या नव्हत्या.  कोव्हॅक्सिन ही दोन मात्रांची लस असून व्हेरो सेल मॅन्युफॅक्चरिंग सुविधेत तयार केली जात आहे.

महाराष्ट्रात १४,८८३ कर्मचाऱ्यांचे  लसीकरण

मुंबई : राज्यातील १४ हजार ८८३  कर्मचाऱ्यांना मंगळवारी करोना प्रतिबंध लस देण्यात आली असून उद्दिष्टाच्या ५२ टक्के  लसीकरण झाले आहे. ‘को-विन’ अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे दोन दिवस स्थगित झालेल्या लसीकरणानंतर मंगळवारी सुरळीत लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात  दुसऱ्या दिवशीही अपेक्षेपेक्षा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कमी होता. पहिल्या दिवशी उद्दिष्टाच्या ६४  टक्के  लसीकरण पूर्ण झाले होते.