कर्नाटकने २० सप्टेंबरपर्यंत तामिळनाडूला कावेरी नदीचे दररोज १२ हजार क्युसेक पाणी द्यावे, असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने देताच कर्नाटकात संतापाची लाट उसळून उफाळलेल्या हिंसाचाराचे लोण तामिळनाडूपर्यंत पोहोचले. दोन्ही राज्यांत असंख्य वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या प्रकारांबरोबरच दगडफेकीच्याही तुरळक घटना घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राला घाईघाईने दहा दंगलविरोधी पथके कर्नाटकात रवाना करावी लागली. दरम्यान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूतील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले असून माध्यमांनीही हिंसाचाराच्या घटना दाखवू नयेत अशी विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटकमधील जनतेला तामिळनाडूतील लोक हिंसाचारास उद्युक्त करत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातील तामिळ लोकांवर व तामिळनाडूतील कानडी भाषिकांवर हल्ले करण्याचे सत्र सुरू झाले आहे. बंगळुरूत हिंसाचार सुरूच असल्यामुळे तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या हिंसाचाराव पाणी वाटपप्रश्नी तोडगा काढण्यासाठी  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले आहे.
पाणी सोडण्यावरून कर्नाटकमध्ये जनक्षोभ उसळला आहे. दोन्ही राज्यातील राजकीय पक्ष व नेत्यांकडून चिथावणीखोर भाषणांमुळे नागरिक अधिकच हिंसक होत आहेत. जाळपोळीच्या घटना, रास्ता रोको, बस फोडण्याचे प्रकार सीमावर्ती भागात सुरू आहे. केंद्राने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगलविरोधी पथक कर्नाटकात पाठवले आहे. सीमा सुरक्षा दल व इतर सुरक्षा दलांकडून प्लॅग मार्च काढण्यात आला.
सोमवारी चिडलेल्या जमावाने बंगळुरू येथील कर्नाटक परिवहनच्या ५६ बस जाळून टाकल्या. बसचे आता फक्त सांगाडे शिल्लक राहिले आहेत.
कर्नाटकालाच दुष्काळाची झळ बसत आहे. त्यांनी तामिळनाडूला कसे पाणी द्यायचे असा सवाल केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी माध्यमांशी बोलताना केला. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कर्नाटकातील अनेक भागांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हैसूरू, हासन, मंडय़ा व बंगळुरू येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला असून, माहिती तंत्रज्ञान उद्योगाला फटका बसला आहे. देशाचे साठ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन बुडत आहे.
हिंसाचाराचा त्याग करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पाण्यावरून असा वाद होणे योग्य नाही. ही खूप दुख:दायक घटना आहे. लोकशाहीत परस्पर संवादाने तोडगा काढता येऊ शकतो. देशाच्या एकतेला प्राधान्य द्या आणि मार्ग शोधा, हिंसाचाराचा त्याग करा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
सिद्धरामय्यांचे जयललितांना पत्र
तामिळनाडूत कानडी भाषकांविरोधातील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र पाठवले. तामिळनाडूतील कानडी भाषकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करतानाच सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील तमिळ नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली. कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची हमी सिद्धरामय्या यांनी जयललिता यांना पत्राद्वारे दिली.
कावेरी देखरेख समितीची बैठक
कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावर कावेरी देखरेख समितीची बैठक केंद्रीय जलसंपदा सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली झाली, त्यात तामिळनाडू व इतर राज्यांना कर्नाटकने २० सप्टेंबरनंतर नेमके किती पाणी सोडावे, यावर विचारविनिमय करण्यात आला.