कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियातून बुधवारी भारतात आणण्यात येणार होते पण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाली येथील विमानतळ बंद असल्याने त्याला उद्या आणले जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याला पहिल्यांदा सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार असून थेट मुंबई पोलिसांच्या हवाली केले जाणार नाही असे सांगण्यात आले. राजन याला खास विमानाने काल रात्रीच भारतात आणण्यात येणार होते, पण सध्या तरी तो डेनपसार येथील कोठडीतच आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, नगुरा राय आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद आहे. रिंजानी ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने तेथे हवेत राख पसरली आहे त्यामुळे छोटा राजनला भारतात आणता आले नाही. २५ ऑक्टोबर रोजी राजन ऑस्ट्रेलियातून बाली येथे आला असता इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीमुळे त्याला अटक करण्यात आली होती. सर्व शर्ती पाळल्या गेल्या व परिस्थिती अनुकूल असेल तर त्याला उद्या भारतात आणले जाणार आहे. राजनला लवकर भारताच्या ताब्यात दिले जाईल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना तशी विनंती करण्यात आली असून सोपस्कार जवळपास पूर्ण झाले आहेत. राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे असून तो अनेक गुन्ह्य़ात भारताला हवा आहे. इंडोनेशियाशी प्रत्यावर्तन करार नसल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून राजनचा ताबा मागितला आहे.
दिल्लीत आणणार
राजनला प्रथम दिल्लीत आणले जाणार असून त्याला आधी सीबीआय कोठडी दिली जाईल व नंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. राजनला थेट मुंबईत आणले जाणार नाही, तर दिल्लीत आणले जाणार आहे त्यामुळे सीबीआय मुख्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली पोलीस व सीबीआय अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठकही काल घेण्यात आली त्यात सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.