बँकांना ३७०० कोटी रुपयांचा चुना लावणारा रोटोमॅक या पेन बनवणाऱ्या कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. सीबीआयने आपल्या दिल्लीतील मुख्यालयात या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.


पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीने ११ हजार ३०० कोटींना चुना लावल्याची बातमी ताजी असतानाच रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी याने ५०० कोटींचा घोटाळा केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अधिकाधिक माहितीनंतर हा आकडा ८०० ते १ हजार कोटींच्या घरात गेला होता. मात्र रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारीने ३ हजार ६९५ कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सीबीआयने केला होता.

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी याने ७ बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, ते परत केलेच नाही त्यामुळे सीबीआयने विक्रम कोठारींच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली होती. दरम्यान, गुरुवारी रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी यांना समन्स बजावत चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावले होते. मात्र, त्यानंतर सीबीआयने या दोघांवर अटकेची कारवाई केली.

बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांकडून विक्रम कोठारीने कर्ज उचलले होते. मात्र, ते परत करण्यात आले नाही. विक्रम कोठारींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने या घोटाळ्य़ाशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत ज्यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले आहे.