पीएनबी घोटाळा प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावला आहे. आज सीबीआयने फायरस्टार इंटरनॅशनलचा अध्यक्ष विपुल अंबानी, अधिकृत स्वाक्षरीकर्त्या कविता माणकिकर, वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजलीचा व्यवस्थापक नीतेन सेठी या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारपर्यंत पीएनबी घोटाळ्याशी संबंधित एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. आता हा आकडा ११ वर पोहचला आहे. ११ हजार ३०० कोटींना चुना लावून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी फरार झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंगळवारीच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. अशात आता सीबीआयने याप्रकरणी धडक कारवाई सुरु केली आहे. ‘एएनआय’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विपुल अंबानी हा धीरुभाई अंबानी यांचा पुतण्या आणि मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. तसेच तो नीरव मोदीच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. रविवारीच सीबीआयने विपुल अंबानीची पाच तास कसून चौकशी केली होती. फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीसाठीचे आर्थिक व्यवहार विपुल अंबानीला ठाऊक होते. त्याच्या देखरेखीखालीच हे व्यवहार झाल्याचीही माहिती समोर आली आहे. आता आज झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर या सगळ्यांच्या चौकशीतून घोटाळ्यासंबंधी काय काय माहिती समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.