आंध्र प्रदेशमधील उद्योजक सललिथ तोतेमपुडी आणि त्याची पत्नी कविता तोतेमपुडी या दाम्पत्याला सीबीआयने शुक्रवारी अटक केली. तोतेमपुडी या दाम्पत्याच्या टॉटेम इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुमारे १,३९४.४३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाबाबत गुरुवारीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

युनियन बँकेच्या पुढाकाराने आठहून अधिक बँकांनी टॉटेम इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली होती. तब्बल सहा वर्षांनी बँकांनी तक्रार दाखल केल्याने सीबीआयने आश्चर्य देखील व्यक्त केले होते.  सुमारे १,३९४.४३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाबाबत हैदराबादस्थित माहिती तंत्रज्ञान कंपनीविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.

सललिथ आणि त्याची पत्नी कविता या दोघांनी कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेची नोटीस न स्वीकारता पळ काढला होता. या दोघांविषयी माहिती देणाऱ्यांना १५ लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाने २०१५ मध्ये ही घोषणा केली होती. २०१२ नंतर सललिथ आणि कविता या दोघांनी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी खोटी ओळख सांगितली होती. शेवटी या दाम्पत्याला अटक करण्यात सीबीआयला यश आले.

दाम्पत्याने युनियन बँकेचे ३१३. ८४ कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३५७. ६४ कोटी रुपये, सिंडिकेट बँकेचे ६४.४८ कोटी रुपये, ओबीसी बँकेचे ७९.९६ कोटी रुपये, आयडीबीआयचे १७४.४७ कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे २०८.६७ कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेचे १२६.३० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले.