सीबीआयमधील वादावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने अहवाल उघड झाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.  मोहोरबंद पाकिटातील अहवाल कसा उघड झाला ?, असा सवाल उपस्थित करतानाच तुम्ही कोणीही सुनावणीसाठी पात्र नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्व वकिलांना झापले आहे.

सीबीआयमधील वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सोमवारी आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतच्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालावर आलोक वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात उत्तर सादर केले. मंगळवारी या प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस के कौल, के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकील फली नरिमन यांनी कोर्टात सांगितले की, गोपाल शंकरनारायणन यांना उत्तर देण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. वर्मा यांचे उत्तर तयार करण्यासाठी आम्ही रात्री उशिरापर्यंत काम केले होते. त्यामुळे शंकरनारायणन यांनी आणखी वेळ मागणे आश्चर्यकारक आहे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर सुप्रीम कोर्टाने नरिमन यांच्या हातात काही कागदपत्रे दिली. ही कागदपत्रे तुम्ही वर्मा यांचे वकील म्हणून नव्हे तर सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून मोठ्याने वाचून दाखवावीत, असे गोगोई यांनी सांगितले. या कागदपत्रांवर मोहोरबंद लिफाफ्यातील अहवालातील मुद्द्यांवर आधारित बातम्यांची प्रिंट होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. मोहोरबंद लिफाफ्यातील अहवाल उघड कसा झाला, असा सवाल कोर्टाने विचारला. तुमच्या पैकी कोणीही सुनावणीसाठी पात्र नाही, असे त्यांनी वकिलांना सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.