बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे त्रस्त असलेल्या केंद्र सरकारने आता याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सीबीआयने बँकांचे मोठ्याप्रमाणात कर्ज असलेल्या कर्जदारांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत मंगळवारी १२ राज्यांसह केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास ५० ठिकाणी छापे मारले. सीबीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, पथकांनी १८ शहरांमध्ये कंपनी, संचालकांसह बँक अधिकाऱ्यांच्या घरी व त्यांच्या ठिकाणांवर छापे मारले.

सीबीआयने दिल्ली, मुंबई, ठाणे, लुधियाना, वलसाड, पुणे, पलानी, गया, गुडगांव, चंदीगढ, भोपाल, सुरत, कोलार आदी ठिकाणी छापेमारी केली. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, बँक घोटाळ्यांच्या १४ नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. ही प्रकरण तब्बल ६४० कोटींच्या फसवणुकीची आहेत.

सीबीआयने ही कारवाई मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास दोन महिने होण्याअगोदरच केली आहे. यावरून बँक गैरव्यवहारप्रकरणी सरकार किती गंभीर झालेले आहे हे दिसत आहे.