उच्चपदस्थांमधील संघर्ष शिगेला; आपल्याच कार्यालयावर छापा

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक अलोक वर्मा आणि उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यातील संघर्ष सोमवारी शिगेला पोहोचला.

देशातील प्रमुख तपास यंत्रणेतील अंतर्गत कलहामध्ये पंतप्रधानांनी हस्तक्षेप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लाचखोरीच्या आरोपावरून उपसंचालक राकेश अस्थाना यांच्या निलंबनासाठी अलोक वर्मा यांनी पावले उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी सीबीआयने आपल्याच कार्यालयावर छापा टाकत अस्थाना यांचे सहकारी देवेंदर कुमार यांना अटकही केली.

रात्री उशिरा अस्थाना यांच्या निलंबनाच्या दिशेने अलोक वर्मा यांनी पावले उचलल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. अस्थाना यांच्या विरोधात लाचखोरी प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात अधिकाऱ्यांमधील संघर्षांचे तीव्र पडसाद उमटले. अस्थाना यांच्या विशेष तपासणी पथकातील महत्त्वाचे अधिकारी  देवेंदर कुमार यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्या कार्यालयामधील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

अस्थाना यांच्या नेतृत्वातील तपास पथकाने लाचखोरी प्रकरणात हैदराबाद येथील उद्योजक सतीश साना याचे निवेदन हेतुपुरस्सर २६ सप्टेंबर २०१८ रोजी नोंदवले असा आरोप आहे. मात्र त्या दिवशी हा उद्योजक हैदराबादमध्ये होता असे तपासात आढळल्याचा सीबीआयचा दावा आहे. देवेंदर कुमार यांनी निवेदनात फेरफार केल्याचा ठपका ठेवीत सोमवारी सीबीआयने त्यांच्या कार्यालयात छापा टाकून त्यांची कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच त्यांना अटक  केली.

यावर्षीच्या जून महिन्यात आपण या प्रकरणाबाबत तेलुगू देसमचे राज्यसभा सदस्य सी.एम. रमेश यांच्याशी चर्चा केली. सीबीआयच्या संचालकांशी चर्चा केल्यानंतर, आपल्याला यापुढे चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितले, अशा आशयाचे साना याचे निवेदन नोंदवण्यात आले होते.

जूननंतर सीबीआयने मला बोलावले नाही. त्यामुळे माझ्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याची माझी समजूत झाली, असे सानाने सांगितले होते.

सीबीआय म्हणते..

राकेश अस्थाना यांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांच्याविरुद्ध केंद्रीय दक्षता आयोगाकडे केलेल्या निराधार आरोपांची पुष्टी व्हावी यासाठी देवेंदर कुमार यांनी सानाच्या निवेंदनात फेरफार केले, असा आरोप सीबीआयने आता केला आहे.

नक्की काय झाले? मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याशी संबंधित प्रकरणात तपास अधिकारी असलेले देवेंदर कुमार यांना हैदराबादेतील एक उद्योजक सतीश साना याचे निवेदन नोंदवताना त्यात फेरफार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिलासा मिळण्यासाठी अस्थाना आणि त्यांच्या पथकाला तीन कोटी रुपयांची लाच दिल्याचा साना याच्यावर आरोप आहे.