व्हॉट्स अ‍ॅप समूहावर चालविण्यात येणारे बाल लैंगिक शोषणाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सीबीआयने उद्ध्वस्त केले असून या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. सदर सूत्रधार बेरोजगार असून तो उत्तर प्रदेशातील कन्नौजचा आहे. व्हॉट्सअ‍ॅप समूहाच्या माध्यमातून बाल लैंगिक ध्वनिचित्रफिती पसरविल्या जात होत्या, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार नोंदविल्यानंतर सीबीआयने दिल्ली, मुंबई, कन्नौज आणि नोइडातील पाच ठिकाणांवर छापे टाकले. अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव निखिल वर्मा असे असून तो वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. तसेच, या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर असलेल्या सर्व सदस्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या बाबत अधिक तपास केला असता सदर व्हॉट्स अ‍ॅप समूहावर ११९ सदस्य असल्याचे आढळले. अमेरिका, चीन, न्यूझीलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, केनया, नायजेरिया आणि श्रीलंका आदी देशांमध्ये या समूहाचे सदस्य आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बाल लैंगिक शोषणाच्या ध्वनिचित्रफिती तयार करणे, ध्वनिचित्रण करणे, दुसऱ्यांना पाठविणे आणि समाजमाध्यमांवर हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा असून त्यानुसार सात वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो.

सीबीआयने छापे टाकले असता मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क आणि अन्य डिजिटल उपकरणे हस्तगत केली. वर्मा याच्यासह नफीस रेझा आणि झाहीद (दिल्ली), सत्येंद्र ओमप्रकाश चौहान (मुंबई) आणि आदर्श (नोएडा) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.