नवी दिल्ली : सिमल्यातील कोतखाई परिसरात नऊ महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणाचा सीबीआयने छडा लावला आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेशातील एका २५ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून घटनास्थळी मिळालेले गुणसूत्र आणि सदर युवकाचे डीएनए जुळले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर मुलीचा मृतदेह कोतखाई परिसरातील जंगलात सापडल्यानंतर त्याचा राजकीय मुद्दा करण्यात आला आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या निवडणुकीत या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना अटक केली होती, मात्र लाय-डिटेक्टर चाचणीत ते निर्दोष आढळल्याने सीबीआयने त्यांची मुक्तता केली होती. सीबीआयने आता अनिलकुमार याला अटक केली असून पीडित मुलीच्या शरीरावर मिळालेले गुणसूत्राचे अंश आणि युवकाचे डीएनए जुळले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिमला जिल्ह्य़ातील कोतखाई परिसरातून शाळेतून घरी परतताना एका १६ वर्षांच्या युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार ४ जुलै २०१७ रोजी घडला होता. तिचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह जंगलात मिळाला होता.