केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीतून न्या. एन व्ही रमण यांनी देखील माघार घेतली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. ए. के. सिक्री यांच्यापाठोपाठ माघार घेणारे रमण हे तिसरे न्यायाधीश आहेत.

सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने १० जानेवारी रोजी हंगामी संचालक म्हणून राव यांची नियुक्ती केली होती. या समितीत न्यायाधीश सिक्री यांचाही समावेश होता. राव यांच्या नियुक्तीला ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीतून न्या. रमण यांनी देखील माघार घेतली.

रमण तिसरे न्यायाधीश

गेल्या आठवड्यात सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करणाऱ्या समितीचा सदस्य असल्याचे कारण देत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माघार घेतली होती. त्यांनी हे प्रकरण न्या. सिक्री यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले होते. यानंतर सिक्री यांनी देखील माघार घेतली होती.