पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि इतरांवर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत २५१ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यात कोट्यवधी किंमतीचे हिरे, सोने आणि दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. नीरव मोदी समूह आणि मेहुल चौक्सी समूहाच्या अनेक संपत्ती जप्त करण्यात आले आहेत. या संपत्तीचे मूल्य ७,६३८ रूपये इतके आहे. इडीने सीबीआयबरोबर दि. २२ मार्च रोजी नीरव मोदीचे निवासस्थान ‘समुद्र महल’वर छापा टाकला होता. या निवासस्थानी महागडे हिरे आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत मोदीच्या निवासस्थानात शोध मोहीम सुरू होती. यादरम्यान १५ कोटी रूपयांचे प्राचीन दागिने, १.४० कोटी रूपयांची आधुनिक घड्याळे आणि एम.एफ.हुसेन, के.के.हेबर आणि अमृता शेरगिल यांची १० कोटी रूपयांची पेटिंग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर इडीने १० कोटींची एक हिऱ्याची अंगठीही जप्त केली आहे.

इडीने १३,५४० कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचे मेहुल चोक्सी यांच्याविरोधात एक वेगळा गुन्हा दाखल केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. इडीने आतापर्यंत देशभरातील २५१ ठिकाणी चौकशी केली आणि यादरम्यान मोठ्याप्रमाणात हिरे, सोने आणि मौल्यवान धातू आणि मोती जप्त करण्यात आले. इडीने या दोघांची ७,६३८ कोटी रूपयांची अचल संपत्तीही जप्त केली आहे. दरम्यान, मोदी आणि चोक्सी कुटुंबीयासह जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच देश सोडून फरार झाले आहेत.