केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजे ‘सीबीआय’ने ब्रिटनमधील केंब्रिज अ‍ॅनॅलिटीका व ग्लोबल सायन्स रीसर्च लि. यांच्याविरुद्ध फेसबुककडून भारतातील वापरकर्त्यांची माहिती व्यावसायिक कारणासाठी मिळवल्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी प्रारंभिक चौकशीत असे दिसून आले की, ग्लोबल सायन्स रीसर्च या संस्थेने ‘धिस इज युवर डिजिटल लाइफ’ नावाचे उपयोजन तयार केले होते. त्याला फेसबुकने त्यांच्या वापरकर्त्यांची माहिती घेण्यास मंजुरी दिली होती. २०१४ मध्ये शैक्षणिक कारणास्तव अशी परवानगी फेसबुक ने दिली होती. कंपनीने केंब्रिज अ‍ॅनॅलिटीकाशी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून त्यांनी मिळवलेली माहिती व्यावसायिक वापरासाठी दिली, असा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, २०१६-१७ मध्ये  ग्लोबल सायन्स  रीसर्च संस्थेने मिळवलेली माहिती नंतर नष्ट केली जाईल,  अशी लिखित ग्वाही या संस्थेने फेसबुकला दिली होती, पण सीबीआयच्या चौकशीत असे आढळून आले की, ही माहिती नष्ट करण्यात आली नाही. प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे की, ग्लोबल सायन्स रीसर्च या ब्रिटनमधील कंपनीने आपला शब्द पाळला नाही. त्यांनी ही माहिती नष्ट केली नाही,  तसेच ती  केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकाला दिली.  धिस इज युवर डिजिटल लाइफ या अ‍ॅपच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात आली होती.  फेसबुकवरील वापरकर्त्यांची ही माहिती आधी ग्लोबल सायन्सला व नंतर केंब्रिज अ‍ॅनलॅटिकाला मिळाली.  त्यात गोपनीयतेच्या कलमाचा भंग झाला आहे, असे सीबीआयच्या प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे.

नफेखोरीसाठी चोरी, निवडणुकांसाठीही वापर

केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले आहे की, १८ महिन्यांच्या  तपासानंतर केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका आणि ग्लोबल सायन्स रीसर्चचे प्रतिनिधी अ‍ॅलेक्झांडर कोगान यांच्यावर भादंविची कलमे व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. एकूण ५.६२ लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांची माहिती यात वापरण्यात आली असून तिचा वापर निवडणुकांत मतदारांवर प्रभाव टाकणे, त्यातून व्यावसायिक नफा मिळवणे यासाठी करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत २५ जुलै २०१८ रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती.  कोगान यांनी धिस इज युवर डिजिटल लाईफ हे उपयोजन कयार करून फेसबुककडून संशोधन व शैक्षणिक कारणासाठी माहिती गोळा केली. त्या उपयोजनाचे एकूण ३३५ वापरकर्ते होते, पण त्यांचे संपर्क जाळे शोधून त्यांचीही फेसबुक माहिती घेण्यात आली. नंतर ही माहिती केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकाला विक ण्यात आली. यात नफेखोरीचा उद्देश होता, असे तक्रारीत म्हटले होते.