आपल्या हवाई प्रवासाची वाढीव बिले (एलटीसी) सादर करून त्याचा परतावा लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने राज्यसभेच्या सहा आजी-माजी खासदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे डी. बंदोपाध्याय, बसपाचे ब्रजेश पाठक आणि मिझो नॅशनल फ्रण्टचे लालहमिंग लिआना हे तीन विद्यमान खासदार आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे जेपीएन सिंग, राष्ट्रीय लोक दलाचे मेहमूद ए. मदानी आणि बीजेडीच्या रेणू प्रधान हे माजी खासदार आहेत.
बंदोपाध्याय यांची कारकीर्द निष्कलंक असल्याचे नमूद करून तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी सीबीआयच्या कृतीचा निषेध केला आहे. आतापर्यंत काँग्रेस सीबीआयचा गैरवापर करीत होती, आता भाजपही त्यांचेच अनुकरण करीत आहे, असेही ब्रायन यांनी म्हटले आहे.
लिआना यांनीही आपल्यावरील आरोपाचे खंडन केले आहे. गैरसमजामुळे हा प्रकार घडला आहे, असे ते म्हणाले. तर रेणू प्रधान यांनी, आपण सोमवारी सीबीआय अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे, सांगितले.
सदर आजी-माजी खासदारांनी बनावट ई-तिकिटे सादर करून राज्यसभा सचिवालयाकडून प्रवासाचा पूर्ण खर्च देण्याची मागणी केली आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद यांनी सांगितले.