एअर इंडियात २०११ साली २२५ कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअर खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एअर इंडियातील अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये ‘एसएपीएजी’ या जर्मन कंपनीतील अधिकारी आणि ‘आयबीएम’ या आंतरराष्ट्रीय कंपनीचाही समावेश आहे.

२०११ मध्ये एअर इंडियामध्ये सॉफ्टवेअरची खरेदी झाली होती. या प्रकरणी गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक अहवालात निदर्शनास आल्याने केंद्रीय दक्षता आयोगाने गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. निविदा काढण्याच्या आणि कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांचा तपास करण्याच्या सूचनाही आयोगाने सीबीआयला दिल्या आहेत. आयोगाच्या शिफारशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रक्रियेत एसएपीआणि आयबीएमला झुकते माप दिल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे. या व्यवहारामध्ये कोणा एका व्यक्तीला लाच मिळाली का,याचीही सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

सॉफ्टवेअर खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एअर इंडियाची नाचक्की झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विमानांच्या पाळल्या जाणाऱ्या वेळा यांच्या आधारे फ्लाईटस्टॅट्सने सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली होती. विमानांच्या वेळा न पाळण्याच्या, चांगल्या सुविधा न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एअर इंडियाचा तिसरा क्रमांक लागला होता.