28 February 2021

News Flash

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीमध्ये अनियमितता केल्याचा ठपका दोघांवरही ठेवण्यात आला आहे

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्ली येथील घरांवर सीबीआयने छापे मारले आहेत. लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीमध्ये अनियमितता केल्याचा ठपका दोघांवरही ठेवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग हे दोघेही लॉयर्स केलक्टिव्ह नावाची संस्था चालवतात. इंदिरा जयसिंग या २००९ ते २०१४ या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेसाठी त्यांनी इतर देशांमधून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही लॉयर्स कलेक्टिव्ह विरोधात करण्यात आलेल्या याचिकेत आहे.

लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेने विदेशी निधीसंदर्भातल्या कायद्याचे अर्थात FCRA चे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचा परवाना रद्द केला. ज्यानंतर सीबीआयने या प्रकरणी आनंद ग्रोव्हर आणि लॉयर्स कलेक्टिव्हविरोधात तक्रार दाखल केली. या छापेमारीदरम्यान आनंद ग्रोव्हर यांच्याशी प्रसारमाध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र जे काही आरोप आहेत ते त्यांनी फेटाळले आहेत.

या छापेमारीवर राजकीय प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे. सीबीआयने अशा प्रकारे कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करणं योग्य नाही असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. जे काही व्हायचं आहे ते कायदेशीर मार्गाने झालं पाहिजे मात्र जे आपलं आयुष्य काद्यासाठी व्यतित करत आहेत त्यांना अशा प्रकारे त्रास देणं योग्य नाही असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 10:27 am

Web Title: cbi is carrying out raids at the residence of supreme court advocates indira jaising and anand grover scj 81
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
3 काश्मीरमधल्या फुटीरतावादी बांडगुळांची छाटणी करा-शिवसेना
Just Now!
X