माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्याविरोधात सीबीआयने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय मंत्रीपदावर असताना  जमिनीसंदर्भातील पर्यावरण मंजुरी देताना एका प्रकरणात नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप नटराजन यांच्यावर आहे. झारखंडमध्ये पर्यावरण मंजुरी देताना जयंती नटराजन यांनी नियम डावलले आहेत असे सीबीआयने म्हटले आहे.

जयंती नटराजन या यूपीए सरकारच्या काळात जुलै २०११ ते डिसेंबर २०१३ पर्यंत पर्यावरण मंत्री होत्या. जानेवारी २०१५ मध्ये राहुल गांधीवर टीकास्त्र सोडत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता नटराजन यांच्यावर एका कंपनीसाठी वन जमीन संरक्षणासंदर्भातले नियम बदलल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

ही मंजुरी देताना वन विभागाच्या महासंचालकांची सूचना आणि हायकोर्टाचे निर्देश पाळण्यात आले नाहीत, असा आरोपही तक्रारीत करण्यात आलेला आहे. आता याच प्रकरणात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, रांची आणि ओडिसा येथील सुंदरगढ भागात सीबीआयने छापेमारीही सुरू केली आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, या सगळ्या प्रकरणात सीबीआयने जयंती नटराजन, इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक उमंग केजरीवाल आणि कंपनीचे काही अधिकारी व काही अज्ञात यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

२०१२ मध्ये वन संरक्षण नियमाचा भंग करत इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेडला वन जमिनीच्या उत्खननासाठी विशेष संमती देण्यात आली होती. या संदर्भात सीबीआयला एकूण तीन तक्रारी मिळाल्या होत्या. त्यांचा तपास सध्या सीबीआयकडून केला जातो आहे.

‘इसीएल’ या कंपनीचा फायदा व्हावा यासाठी ५५. ७९ हेक्टर वन जमिनीवर उत्खनन करण्याची परवानगी जयंती नटराजन यांनी दिली होती. जयंती नटराजन यांनी पदभार सांभाळताच इसीएल कंपनीला ५५.७९ हेक्टर वनक्षेत्रात उत्खननास मंजुरी दिली. पर्यावरण राज्यमंत्र्यांनी ही परवानगी नाकारूनही जयंती नटराजन यांनी पदाचा गैरवापर करत परवानगी दिली होती. याप्रकरणी आता सीबीआयतर्फे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जयंती नटराजन यांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे.