01 December 2020

News Flash

सीबीआय.. गृहमंत्रीपद… चिदंबरम आणि अमित शाह यांच्याबद्दलचा अजब योगायोग

नऊ वर्षांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे उलट होती

अमित शाह आणि पी. चिदम्बरम

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना रात्री पावणे दहाच्या सुमारास अटक झाली. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी चिदंबरम यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे ती चिदंबरम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलच्या आगळ्यावेगळ्या योगायोगाची.

अमित शाह हे गृहमंत्री असून चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच नेटकऱ्यांना आता नऊ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची आठवण झाली आहे. २०१० साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना चिदंबरम गृहमंत्री होते. त्यावेळी गँगस्टर सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयनं २५ जुलै २०१० रोजी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना अटक केली होती. गांधीनगर इथल्या सीबीआय ऑफिसमध्ये शाह हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती. ‘सोहराबुद्दीन बनावट चकमक’प्रकरणी सीबीआयनं अमित शाह यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील चौकशीसाठी सबीआयानं दोनदा समन्स बजावूनही शाह उपस्थित न राहिले नव्हते. त्यावेळी अमित शाह यांच्या घरी सीबीआयने धाड टाकली होती. तेव्हा शाह त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्येही सापडले नव्हते. अखेर सीबीआयने अमित शाह यांच्यासह १५ जणांवर २४ जुलै रोजी आरोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आता चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता तसाच जामीन शाह यांनाही नाकारण्यात आला होता. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनाही या योगायोगासंदर्भात ट्विट करत ‘एक वर्तुळ पूर्ण झाले’, असे म्हटले आहे.

त्यावेळी काय म्हणाले होते अमित शाह

याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी २४ जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला होता. सीबीआयला हाताशी धरून काँग्रेस गुजरात सरकारचा आणि भाजप सरकारचा ‘पॉलिटिकल एन्काऊंटर’ करत असल्याचेही शाह यावेळी म्हणाले होते. “सीबीआयच्या ३० हजार पानांच्या आरोपपत्रात मी गुंड, खंडणीखोर, अपहरणकर्ता असल्याचं म्हटलं आहे. पण हे आरोपपत्र काँग्रेसने तयार केल आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या एकाही आरोपात तथ्य नाही, ही काँग्रेसची चाल आहे. राजकीय हेतूने त्यांनी माझ्यावर ही चिखलफेक केली आहे. पण न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून मी ही लढाई जिंकेन,” असा विश्वास शाह यांनी त्यावेळी बोलताना व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 10:06 pm

Web Title: cbi p chidambaram amit shah home minister post uncanny coincidence scsg 91
Next Stories
1 काही जणांना खूश करण्यासाठी कारवाई – कार्ती चिदंबरम
2 मी कोणताही गुन्हा केलेला नाही – पी चिदंबरम
3 ट्विटर डाऊन झाल्याने युजर्सचा संताप
Just Now!
X