अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येसाठी कथितरीत्या प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली.

मुक्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचे नमूद करतानाच, हा तपास सीबीआयला सोपवण्यास मान्यता देण्यासाठी बिहार सरकार पात्र आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

रिया चक्रवर्ती हिने आपल्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला एफआयआर पाटण्याहून मुंबईला वर्ग करण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्या. हृषीकेश रॉय यांनी हा निर्णय दिला. सुशांतचे वडील कृष्णकिशोर सिंह यांच्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर योग्य आहे, तसेच तो सीबीआयकडे सोपवला जाणेही वैध आहे, असे त्यांनी सांगितले.

सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे नोंदवलेल्या एफआयआरसंबंधी सीबीआयमार्फत तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस आपण स्वीकारली असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते. या तक्रारीत सिंह यांनी रिया व इतर सहा जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करण्यासह इतर आरोप लावले होते.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील तपासात बरीच प्रगती केली असून, त्यांनी या प्रकरणी ५६ लोकांचे जबाब नोंदवले असल्याचा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी केला होता. सुशांतच्या वडिलांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी याला विरोध करताना, आपल्याला महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नसल्याचे म्हटले होते.

न्यायालय म्हणाले..

* बिहार पोलिसांनी सुशांतच्या मृत्युबाबत नोंदवलेला ‘एफआयआर’ योग्य आहे,

* या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित आहे.

* सुशांत राजपूतच्या मृत्यूच्या संदर्भात आणखी एखादे प्रकरण दाखल करण्यात आले, तर सीबीआयच त्याचा तपास करेल.

वाद-प्रतिवाद..

सुशांत राजपूतच्या प्रकरणात ‘राजकीय प्रभावाने’ मुंबई पोलिसांना एफआयआरदेखील नोंदवू दिलेला नाही, असे बिहार सरकारने न्यायालयाला सांगितले होते. तर, बिहार सरकारला या प्रकरणी तपास करण्याची कार्यकक्षाच नाही, असा दावा महाराष्ट्र सरकारने केला होता.

पार्थ पवारांचे ‘सत्यमेव जयते’

सुशांतसिंह याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार याला कवडीची किं मत देत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी फटकारले होते. त्याच पार्थने सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यावर सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रि या व्यक्त करीत आजोबांवरच कुरघोडी केली.

सुशांतसिंह याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर पार्थ पवार याने ट्वीट करून सत्यमेव जयते! अशी प्रतिक्रि या व्यक्त केली.

‘मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव’

गृहमंत्री म्हणून मी मुंबई पोलिसांचे काम जवळून बघितले आहे. मुंबई पोलीस तपासकामात चोख असले तरी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांच्यावर राजकीय दडपण असल्याने अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  येथे केला. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास आहे. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने राज्य सरकारने याप्रकरणी  चुकांबाबत आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तपास कोणतीही यंत्रणा करो, सत्य बदलणार नाही. मुंबई पोलीस, ईडी प्रमाणे रिया चक्रवर्ती सीबीआय तपासाला संपूर्ण सहकार्य करेल, सामोरे जाईल. महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यांनी एकमेकांवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले.

अँड. सतीश मानेशिंदे, रिया चक्रवर्तीचे वकील

मुंबई पोलीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयला सहकार्य करतील. अद्याप निकालपत्र हाती पडलेले नाही. निकल पत्राचे वाचन/अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ.

– परमबीर सिंग, मुंबई पोलीस आयुक्त