पश्चिम बंगालमधील कोळसा चोरी प्रकरणाचा सीबीआय तपास

कोळसा चोरी प्रकरणातील तपासात सहभागी व्हावे, अशी नोटीस केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला बजावली. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष  या घडामोडीमुळे आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम बंगालमधील ईस्टर्न कोलफील्ड्सच्या खाणींतील कोळसा चोरीच्या प्रकरणाच्या संबंधात सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमेश कुमार यांनी जारी केलेली ही नोटीस सीबीआयच्या एका पथकाने अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा  बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील घरी जाऊन त्यांना दिली. ‘या प्रकरणाशी संबंधित काही प्रशद्ब्राांची उत्तरे देण्यासाठी हरीश मुखर्जी मार्गावरील तुमच्या पत्त्यावर आज हजर राहावे’, असे रविवारी बजावलेल्या या नोटिशीत म्हटले आहे. अशीच नोटीस रुजिरा यांची बहीण मेनका गंभीर यांनाही बजावण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल- मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली २०११ व २०१६ साली सलग विजय मिळवणाऱ्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे.

प्रकरण काय?

कोळसा चोरी प्रकरणाचा कथित सूत्रधार मांझी ऊर्फ लाला, ईस्टर्न कोलफिल्ड्सचे (ईसीएल) महाव्यवस्थापक अमित कुमार धर आणि दुसरे अधिकारी जयेश चंद्र राय, ईसीएलचे सुरक्षा प्रमुख तन्मय दास, विभागीय सुरक्षा निरीक्षक धनंजय राय आणि काजोर क्षेत्राचे सुरक्षा प्रभारी देवाशीष मुखर्जी यांच्याविरुद्ध गेल्या नोव्हेंबरमध्ये एफआयआर दाखल केला होता.

आरोपी मांझी लाला हा कोळशाचे अवैध खाणकाम आणि कुनुस्तारा व काजोरा क्षेत्रातील भाडेपट्टीवर दिलेल्या खाणींतून कोळशाची चोरी यात गुंतलेला होता, असा आरोप आहे.

तृणमूल- भाजपचे आरोप-प्रत्यारोप

आज दुपारी २ वाजता सीबीआयने माझ्या पत्नीच्या नावे एक नोटीस बजावली. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. तथापि, अशा डावपेचांचा वापर ते आम्हाला घाबरवण्यासाठी करू शकतील असे त्यांना वाटत असेल, तर ही त्यांची चूक आहे. आम्ही दबून जाणारे लोक नाही’, असे ट्वीट अभिषेक बॅनर्जी यांनी केले. तर, ‘आता भाजपचा सीबीआय हा एकच मित्र उरला आहे’, असे सांगून ही राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.

या प्रकरणाचे राजकीयीकरण करत असल्याचा आरोप करून भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीका केली आणि कायदा त्याचे काम करील असे सांगितले. सीबीआयने शुक्रवारी या प्रकरणाच्या संदर्भात पुन्हा काही ठिकाणी छापे घातले होते, याचा त्यांनी उल्लेख केला.