दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापा टाकल्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. सीबीआयने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर नव्हे, तर त्यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. मात्र, घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या कार्यालयात असा छापा कसा काय टाकला जाऊ शकतो, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापा टाकून त्यांचे कार्यालयच सील करण्याचा प्रकार अभूतपूर्व आहे. या घटनेमुळे मला तीव्र धक्का बसला आहे, असे म्हटले आहे.
राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी हा मुद्दा उपस्थित करीत केंद्र सरकारने सभागृहात आपली बाजू स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना जेटली यांनी या छाप्यांचा केजरीवाल यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिवांनी तिथे रुजू होण्यापूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मिळून १४ ठिकाणी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले आहेत, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांनी मात्र ट्विटरच्या माध्यमातून जेटली यांनी दिलेले उत्तर फेटाळून लावले. जेटली संसदेत खोटे बोलत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी माझ्या कार्यालयातील फाईलींची छाननी केली जात आहे. राजेंद्र कुमार यांचे नाव पुढे करून केंद्र सरकार माझ्याविरोधातच कारवाई करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.