नवी दिल्ली : एका  स्थावर मालमत्ता व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणी सीबीआयने समाजवादी पक्षाचे माजी खासदार अतीक अहमद व इतरांच्या घरावर छापे टाकले.

उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांसह एकूण सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. याबाबत अधिक तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे. सीबीआयने गेल्या महिन्यात अहमद व त्यांच्या साथीदारांवर स्थावर मालमत्ता व्यावसायिक मोहित जैसवाल यांचे अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणी डिसेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता.  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती. जैसवाल यांचे लखनौ येथून अपहरण करून त्यांना देवरिया तुरूंगात नेले  होते. तेथे अहमद व त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांचा उद्योग स्वत:च्या नावे हस्तांतरित करून घेतला, असे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. अहमद हे उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघाचे २००४ ते २००९ दरम्यान खासदार होते.