केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून एका घोटाळ्याच्या आरोपाखाली लष्कराच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कथित जमिनीसाठी भारतीय सैन्याकडून भाडे दिल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येते आहे. लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी मागील १६ वर्षे पाकव्याप्त काश्मीरमधील जमिनीसाठी भाडे देऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करुन जमिनीची खोटी कागदपत्रे घेऊन पैशांचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

‘२००० सालानंतर लाखो रुपये भाड्यापोटी देण्यात आले आहेत,’ अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली असल्याचे डेक्कन क्रोनिकल या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘१९६९-७० च्या रजिस्टरनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील मकबूजा येथील काही भागातील जमिनीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून भाडे दिले जाते आहे. या जमिनीच्या मालकाला संरक्षण मंत्रालयाकडून भाडे दिले जाते आहे. मात्र या जमिनीचा मालक खरंच अस्तित्वात आहे की तो फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, याचा तपास आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे. या घोटाळ्याच्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

‘२००० साली तत्कालीन सब डिविजनस एस्टेट ऑफिसर (जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील) आर. एस. चंदेरवंशी, नौशारातील खंभा गावचे पटवारी दर्शन कुमार, राजेश कुमार आणि अन्य लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासातून समोर आली आहे. या कटानुसार विभिन्न जमिनी लष्करासाठी भाड्याने उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या सर्व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवण्यात आल्या,’ अशी धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली आहे.