हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपप्रकरणी त्यांचा जामीन तातडीने रद्द करण्यासाठीची सुनावणी तातडीने आजच (सोमवारी) घ्यावी, अशी विनंती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली उच्च न्यायालयास केली आहे.
चौताला यांना वैद्यकीय कारणास्तव यंदाच्या वर्षी मे महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु हरयाणात येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेत ७९ वर्षीय चौताला सक्रिय सहभागी होत असून त्यामुळेच त्यांचा जामीन तातडीने रद्द करण्यात यावा, अशी विनंती सीबीआयने न्यायालयास केली.
शिक्षकांच्या नियुक्तीप्रकरणी झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौताला यांना गेल्या वर्षी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र ‘वैद्यकीय उपचार’ घेण्याच्या सबबीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. चौताला यांनी त्यानंतर वारंवार जामीन अटींचा भंग केल्याचे सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वत: होऊन २७ सप्टेंबर रोजी शरण येण्याची तयारी दर्शविली. मात्र १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी शरण येण्याचा आदेश देण्यात आला. मात्र चौताला यांनी हरयाणातील जिंद येथे २५ सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण केल्याची बाब सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणली आणि अशाच प्रकारे ते जामीन अटींचा भंग करीत असल्याचे सांगत त्यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांची तुरुंगात तातडीने रवानगी करावी, अशी विनंती सीबीआयने केली आहे.