पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं सोमवारी टाळे ठोकले आहे. निरव मोदीनं केलेल्या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या केंद्रस्थानी पीएनबीची मुंबईतील ही शाखा आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या राही कर्मचाऱ्यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. निरव मोदीच्या फाइव स्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानी यांचीही चौकशी सध्या सीबीआयकरत आहे.

भारतात हजारो कोटींचे घोटाळे झाले असले तरी बँकिंग क्षेत्रातला सगळ्यात मोठा घोटाळा असे वर्णन पीएनबी घोटाळ्याचे करण्यात येत आहे. बँकेतल्या आजी माजी व वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे जगभरातील भारतीय बँकांच्या शाखांमधून एकूण 11,400 कोटी रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कारवाई होण्याच्या आत निरव मोदी कुटुंबियांसह फरारही झाला असून त्याला भारतात आणण्याचा प्रयत्नही होत आहे.

सीबीआयनं पीएनबीच्या मुंबईतल्या शाखेमध्ये रविवारी जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. याच शाखेमधून निरव मोदी व त्याचा काका मेहूल चोक्सी यांनी घोटाळ्याची सुरूवात केल्याचे आढळले आहे. पीएनबीच्या लक्षात हा प्रकार होईपर्यंत 11,400 कोटी रुपयांना चुना लावला गेला होता तसेच याची व्याप्ती आणखी जास्त असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

आता सीबीआयने जनरल मॅनेजर या स्तरावरील अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे पीएनबीच्या एकूण 11 कर्मचाऱ्यांची चौकशी आता सीबीआय करत आहे. बँकेचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी, सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात यांसह अन्य काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. एकूण घोटाळ्याच्या व्याप्तीचा अंदाज येण्यासाठी अक्षरश: हजारो कागदपत्रांचा तपास सीबीआय करत आहे. परिणामी सीबीआयनं पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या या शाखेलाच टाळं ठोकलं आहे.

विशेष म्हणजे निरव मोदी, मेहुल चोक्सी व त्याच्या कंपन्यांविरुद्ध तक्रार करणारी पीएनबी ही एकमेव बँक नाहीये. 24 कंपन्या व 18 उद्योजक ज्यांनी निरव मोदीच्या डायमंड ब्रँडची फ्रँचायजी घेतली होती त्यांनीही फसवले गेल्याची तक्रार केली आहे. या तक्रारदारांनी नरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी फसवल्यामुळे आर्थिक दिवाळखोरीही जाहीर केली आहे.