आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक त्यांच्या मागावर आहे. बुधवारी सकाळीही सीबीआयचे पथक चिदम्बरम यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, अटक टाळण्यासाठी ते सध्या भूमिगत झाले आहेत. चिदम्बरम यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, काँग्रेसचे तीन ज्येष्ठ विधिज्ञ त्यांची बाजू मांडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. मात्र, चिदम्बरम यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाकडून दणका मिळाल्याने चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर लागलीच सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. यावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनाचा अर्ज फेटाळून लावताच सीबीआयने चिदम्बरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. मात्र, ते घरी नसल्याने पथकाला दोन तासात हजर होण्याची नोटीस चिटकवून रिकाम्या हातानेच परतावे लागले. सीबीआयचे दोन अधिकारी रात्रभर चिदम्बरम यांच्या घरी ठाण मांडून होते. बुधवारी सकाळी सीबीआयचे पथक घरी गेले. हे पथक सध्या चिदम्बरम यांच्या घरीच आहे.

अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसमधील तीन ज्येष्ठ वकील चिदम्बरम यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शीद हे तिघेही त्यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी युक्तिवाद करणार आहेत. आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणी चिदम्बरम यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेल्या समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते चौकशीला हजर राहतात. त्यामुळे अटक करण्याचे कोणतेही कारण नाही, असा युक्तिवाद करणार आहे. दिल्ली न्यायालयाकडून जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास केलेल्या विलंबाबद्दल अभिषेक सिंघवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सात महिन्यांपूर्वी हा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सात महिने निकाल राखून ठेवला. तसेच ४ वाजता सुनावणी घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणेही अवघड झाले, असे सिंघवी म्हणाले.
प्रकरण काय?
आयएनएक्स मिडिया ग्रुपला २००७मध्ये ३०५ कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून प्राप्त झाली. त्यावेळी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या गुंतवणुकीस परवानगी देताना हा गैरव्यवहार झाला आहे. त्यावेळी चिदम्बरम अर्थमंत्री होते. सीबीआयने याप्रकरणी १५ मे २०१७ रोजी प्राथमिक तक्रार दाखल केली. ईडीने २०१८मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याआधी २५ जुलै २०१८ रोजी दिल्ली न्यायालयाने त्यांच्या अटकेस परवानगी नाकारली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi searching to p chidambaram top congress lawyers gear up for legal fight in sc bmh
First published on: 21-08-2019 at 08:34 IST