बंगळुरूतील विशेष सीबीआय न्यायालायने बुधवारी ४० कोटींच्या लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांसह अन्यजणांची निर्दोष मुक्तता केली.
येडियुरप्पा , त्यांची दोन मुले, जावई, जेएसडब्ल्यू कंपनी आणि बेलारीस्थित चार कंपन्यांवर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० मध्ये येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांना ४० कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. येडियुप्पा यांच्या २००८ ते २०११ या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सरकारी फायदे पदरात पाडून घेण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचा आरोप होता. याप्रकरणी सर्व २१६ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी १६ ऑक्टोबर २०१२ रोजी येडियुरप्पा आणि अन्य १२ जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान येडियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्र आणि बी.वाय. विजेंद्र , जावई सोहन कुमार यांच्या बँक खात्यात २० कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याचे उघड झाले होते. पोलाद खाणींचा फायदा व्हावा, यासाठी हे पैसे जेएसडब्ल्यूशी संलग्न असणाऱ्या साऊथ वेस्ट मायनिंग कंपनीने दिले असल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता. याशिवाय, जेएसडब्ल्यूशीच संलग्न असणाऱ्या कंपनीकडून येडियुरप्पा यांच्या मुलाच्या प्रेरणा एज्युकेशनल अँण्ड सोशल ट्रस्टला २० कोटी रूपयांची देणगीही देण्यात आली होती. मात्र, या सर्व आरोपांतून येडियुरप्पांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.
येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पक्षातून काही काळ बाहेर पडत स्वत:चा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परतले. लोकसभेला ते शिमोगा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये त्यांची कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. कर्नाटकमधील लिंगायत समाजाचा  येडियुरप्पा यांना मोठ्याप्रमाणावर पाठिंबा आहे.