मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शुक्रवारी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) बँक फ्रॉड प्रकरणी रतुल पुरी यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे मारले. विशेष म्हणजे छापा मारताना सीबीआयच्या पथकाने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली होती. सीबीआयच्या पथकाने पीपीई किट घालून छापेमोरी केली.


रतुल पुरी यांच्याशी संबंधित दिल्ली आणि नोएडामधील काही ठिकाणी सीबीआयने ही छापेमारी केली. रतुल पुरी आणि त्यांचे वडील दीपक पुरी यांच्याविरोधात दाखल झालेल्या नव्या एफआयआरनंतर ही छापेमारी करण्यात आली. रतुल पुरी व दीपक पुरी दोघंही Moser Baer Solar Ltd(MBSL) या कंपनीचे संचालक असून त्यांच्याविरोधात बँकेला ७८७ कोटी रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी एफआयआर दाखल कऱण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँक(पीएनबी) आणि अन्य काही बँकांचं ७८७ कोटी रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी पीएनबीने पुरी यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली होती.

“करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन छापेमारी करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. सर्व पथकाने पीपीई किट्सचा वापर केला”, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ता आरके गौर यांनी दिली. तसेच, सीबीआयने पुरी यांच्याविरोधात दाखल केलेली ही दुसरी एफआयआर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांच्याविरोधात ३५४ कोटी रुपयांच्या बँक फ्रॉड प्रकरणी एफआयआर दाखल झाली होती. रतुल पुरी यांच्याविरोधात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणीही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सप्लीमेंट्री चार्जशीट फाइल करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती, नंतर डिसेंबरमध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.