हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. या कंपनीसमवेत १० हजार कोटी रुपयांचे संरक्षण मंत्रालयाचे कंत्राट पदरात पाडून घेण्यासाठी रोल्स रॉयस या ब्रिटनस्थित कंपनीने ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने सीबीआयला दिले आहेत.
संरक्षण मंत्रालयाचा हा करार मिळविण्यासाठी आपल्याला मदत करावी म्हणून लंडनस्थित कंपनीने आपल्या उपकंपन्यांना लाच दिली होती. सदर पैसा कसा आणि कोणत्या पद्धतीने कोणाकोणाला देण्यात आला त्याची चौकशी करण्याची कामगिरी संरक्षण मंत्रालयाने सीबीआयवर सोपविली आहे. या पैशाच्या व्यवहारातील लाभार्थ्यांचीही चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांत लंडनस्थित कंपनीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला पाच हजार कोटी रुपये दिले आहेत. अशोक पटनी आणि त्याची सिंगापूरस्थित कंपनी अ‍ॅशमोर प्रा. लि. यांची सदर करार मिळविण्यासाठी मदत घेतल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या प्रकारानंतर संरक्षण मंत्रालयाने सीबीआय चौकशी प्रलंबित असल्याने रोल्स रॉयससमवेतचे सर्व करार स्थगित ठेवले असून लाच म्हणून देण्यात आलेली रक्कम हस्तगत करण्याचेही ठरविले आहे. एजेटी हॉक, जॅग्वार, अ‍ॅव्हरो, किरण एके-२ आणि सी हॅरिअर व सी किंग हेलिकॉप्टर या सहा प्रकारच्या विमानांसाठी रोल्स रॉयसने इंजिनांचा पुरवठा केला आहे.