केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी छापा टाकला. सीबीआयने मनी लाँडरिंगप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या पत्नीची चौकशी केल्याचे सांगण्यात येते. यावर आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकार सीबीआयच्या माध्यमातून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सत्येंद्र जैन यांच्या ज्या कर्मचाऱ्यांवर हवालाचा आरोप करण्यात आला आहे. ते कर्मचारी अस्तित्वातच नाहीत. प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयला अजूनही त्या व्यक्तींना समोर आणता आलेले नाही. ज्या क्रमांकावरून हवाला व्यापाऱ्यांना फोन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ते क्रमांक २०१४ पासून बंद आहेत. त्यापूर्वीही अशा प्रकारचे कॉल केल्याचे रेकॉर्ड नसल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.

या महिन्याच्या प्रारंभी सीबीआयने सत्येंद्र जैन यांची सलग दोन दिवस चौकशी केली होती. पहिल्या दिवशी ८ तर दुसऱ्या दिवशी ५ तास चौकशी केली होती. सीबीआयने एप्रिल महिन्यात जैन यांच्याविरोधात तपास सुरू केला होता तसेच त्यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे. सीबीआयने ४.६३ कोटी रूपयांच्या धनशोधन प्रकरणी वर्षे २०१५-१६ दरम्यान जमा केलेल्या पुराव्याच्या आधारे जैन यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.

त्यांना कोलकाताची कंपनी प्रयास इन्फो प्रायव्हेट लि. अकिचंद डेव्हल्पर्स तसेच मेघालय प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. च्या माध्यमातून गुन्हयात सहभागी असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.