करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण बोर्डानं मोठं पाऊल उचललं आहे. या दोन्ही बोर्डानं आपल्या १० आणि १२ वीच्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन या परीक्षांचं पुढील टाइम टेबल लवकरच प्रसिद्ध केलं जाणार असल्याचंही त्यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवलं आहे.

आयसीएसई बोर्डाच्या कार्यक्रमानुसार, बारावीच्या बोर्डाची परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरु होऊन ३१ मार्चपर्यंत चालणार होती. तर दहावीची बोर्डाची परीक्षा २७ फेब्रुवारीला सुरु होऊन ३० मार्च दरम्यान चालणार होती. मात्र, आता सर्व परीक्षा बोर्डाने स्थगित केल्या आहेत.

बुधवारी सीबीएसई बोर्डाने करोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या होत्या. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “भारत आणि परदेशात सीबीएसईकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन त्या पुन्हा सुरु करण्यात येतील. त्याचबरोबर सध्या सुरु असलेलं पेपर तपासणीचं काम देखील या काळात बंद राहणार आहे.”

याशिवाय राष्ट्रीय परीक्षण एजन्सीद्वारे (एनटीए) आयआयटी आणि इंजिनिअरिंगसाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य २०२० देखील स्थगित करण्यात आली आहे. एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जेईईची मुख्य परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नव्या तारखांची घोषणा ही बोर्डाच्या परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांचे टाइमटेबल पाहून जाहीर केले जाईल.” जेईई मुख्य परीक्षा २०२० ही ५ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात होणार होती.