केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यावेळी नोएडातील मेघना श्रीवास्तव ही विद्यार्थीनी ९९.८ टक्के मिळवत देशात पहिली आली. मेघनाला एकूण ४९९ गुण मिळाले आहेत. निकाल लागल्यानंतर मेघना कोणत्या क्षेत्रात करिअर करणार हा प्रश्न सा-यांनाच पडला आहे. मात्र मेघनाने तिच्या करिअरविषयी एक खुलासा केला आहे.

मेघनाला मानसशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून पुढे ती मानसशास्त्र या विषयावर लक्षकेंद्रीत करणार आहे. मानसशास्त्र तिचा आवडता विषय असल्यामुळे याच विषयात काही तरी करावं अशी तिची इच्छा आहे. मात्र, पुढे जाऊन कोणत्या क्षेत्राची निवड करावी हे निश्चित नाही. त्यामुळे करिअरबाबत अद्याप काहीच ठरविले नसल्याचे तिने सांगितले. ‘करिअर म्हणून कोणत्या क्षेत्राची निवड करावी हे अजून ठरवलं नाही. त्यावर फक्त विचार सुरु आहे’, असेही ती म्हणाली.

पुढे ती असेही म्हणाली, वर्षभर मेहनत केल्यानंतर मला आजचा दिवस बघायला मिळत आहे. मला प्रत्येक विषय आवडतो त्यामुळे मी प्रत्येक विषयाला समान वेळ देत होते. मी रात्री जागून कधीच अभ्यास केला नाही. त्यामुळे माझ्या यशामागे कोणतंही मोठ गुपित लपलेलं नाही. उलट माझ्या मेहनतीबरोबर माझे आई-वडील आणि शिक्षक यांनीदेखील मेहनत घेतली. माझ्या गुणांमध्ये त्यांचे योगदान अधिक आहे, असे मेघनाने यावेळी सांगितले.

मेघनाने उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरमधील स्टेप बाय स्टेप स्कूल येथून शिक्षण पूर्ण केलं असून तिला इतिहास, भूगोस,मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी या विषयात ९९ गुण मिळाले आहेत.