News Flash

CBSE Exam : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द! केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला आहे.

‘करोनापूर्व काळा’तील संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

दरम्यान, परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य!

दरम्यान, हा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. “CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवे”, असं पंतप्रधानांनी हा निर्णय घेताना म्हटलं आहे.

वाचा सविस्तर – बहुतांश राज्यांना बारावीची परीक्षा हवी!

परीक्षांचं प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात!

यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालया देखील सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सीबीएसई बोर्डाला आणि पर्यायाने केंद्र सरकारला यासंदर्भात निश्चित असा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. खंडपीठाने केंद्राला “जो निर्णय घ्याल तो योग्य घ्या. पण जी चिंता व्यक्त केली जात आहे त्याच्यावर लक्ष द्या. गेल्यावर्षी घेतलेल्या निर्णयाचे या वर्षीदेखील पालन करायला हवे असं याचिकर्त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा काही वेगळा निर्णय घेत असाल तर त्यासाठी योग्य कारण सांगा. यावर्षीसारखीच परिस्थिती गेल्यावर्षी देखील होती,” असे कोर्टाने सांगितले होते. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जून रोजी घेण्याचे देखील निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 7:40 pm

Web Title: cbse board class 12 exams cancelled pm narendra modi hold meeting pmw 88
टॅग : Exam
Next Stories
1 वाराणसीतली इमारत कोसळली; खुद्द पंतप्रधानांनी केला जिल्हाधिकाऱ्यांना फोन
2 Social Guidelines : Whatsapp चं पहिलं पाऊल! भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती!
3 पत्नीकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल कायदा नाही, हे दुर्दैव – मद्रास उच्च न्यायालय
Just Now!
X