केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी मोठा दिलासा दिला. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेणार नाही, असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. देशातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांवरील फेरपरीक्षेचे संकट अखेर टळले असून मंगळवारी दुपारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

सीबीएसईच्या दहावीचा गणिताचा पेपर तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यामुळे या दोन्ही पेपरची फेरपरीक्षा घेतली जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले. मात्र, यावरुन टीका होताच सीबीएसईने एक पाऊल मागे टाकत सरसकट सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार नाही, असे सांगितले. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती फक्त दिल्ली व हरयाणा या दोनच राज्यांमध्ये घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. जुलैमध्ये ही परीक्षा होईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती.

अखेर मंगळवारी सीबीएसईने देशात कोणत्याही राज्यात सीबीएसईच्या दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा होणर नाही, असा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी या निर्णयाची माहिती देण्यात आली. पेपरफुटीचा गणिताच्या परीक्षेवर फारसा परिणामा झाला नाही, असे चौकशीतून समोर आल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे समजते.

दुसरीकडे फेरपरीक्षेविरोधात दिल्ली हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झाल्या होत्या. चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यातील निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत असे असताना फेरपरीक्षा देणे सयुक्तिक नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
दिल्ली हायकोर्टानेही फेरपरीक्षेवरुन सीबीएसईला फटकारले होते. दहावीची फेरपरीक्षा जुलैमध्ये का घेतली जात आहे, असा सवाल हायकोर्टाने विचारला होता.