सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएससीने यंदाच्या NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही. तसेच कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची यादी जाहीर केली आहे. ही नियमावली परिक्षार्थींना काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना परिक्षेला मुकावे लागू शकते.

NEETने नुकतेच परिक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आता ही परिक्षा देणाऱ्या देशभरातील परिक्षार्थींना नवा ड्रेसकोड जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये परिक्षार्थींना फिक्या रंगाचे कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना पायात शूज आणि पायमोजे घालता येणार नाहीत. त्याऐवजी सँडल किंवा चप्पल वापरता येईल. पूर्ण बाह्यांचे शर्ट किंवा कुर्ता घालता येणार नाही. त्याऐवजी अर्ध बाह्यांचे शर्ट घालायचे आहेत. या कपड्यांवर मोठ्या आकारातील बटन्स, बॅच किंवा फूल लावता येणार नाही. मुलींनी शक्यतो पारंपारिक सलवार कमीज किंवा ट्राऊजर वापरता येणार आहे. त्याचबरोबर परिक्षा केंद्रांवर परिक्षार्थींचे सामान ठेवण्याची कुठलीही सुविधा असणार नाही. त्यामुळे त्यांना सोबत पेन्सल बॉक्स, हँडबॅग, बेल्ट, टोपी, घड्याळ आणि ज्वेलरी सोबत बाळगता येणार नाही. गेल्यावर्षी देखील NEET परिक्षेसाठी अशाच स्वरुपाचा ड्रेसकोड ठेवण्यात आला होता.

दरम्यान, नव्या नियमावलीबाबत सीबीएससीने सांगितले की, ज्या परिक्षार्थींना पारंपारिक कपड्यांमध्ये यायचे आहे. त्यांना परिक्षा केंद्रावर एक तास आगोदर यावे लागेल. संपूर्ण तपासणीनंतरच त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डोक्यावर बांधलेला कपडा (पगडी, टोप्या) आणि हिजाब काढण्यास परिक्षार्थींना सांगण्यात आले होते. यावरुन मोठे वादंगही माजले होते. परिक्षेत कुठल्याही प्रकारे कॉपीचे प्रकार होऊ नयेत म्हणून ही कडक खबरदारी घेण्यात आली आहे.

रविवार, ६ मे रोजी यंदाची NEET परिक्षा होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परिक्षा होणार असून यासाठीचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सुट्टी असल्या तरी वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात येणार नाही, असेही सीबीएससीने स्पष्ट केले आहे.