दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी नवा दावा केला आहे. दिल्ली पोलिसांनी आज पेपरफुटीप्रकरणी आणखी तिघांना अटक केली. कड्कड्डूमा न्यायालयाने या तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परिक्षेच्या अर्ध्या तासाआधी अर्थशास्त्राचा पेपर फुटला आणि त्याचे छायाचित्र व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एक दिवसाआधी व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या हस्तलिखित उत्तर पत्रिकेबाबत अजूनही रहस्य कायम आहे. त्याचबरोबर दहावीच्या गणिताच्या पेपरफुटीप्रकरणाबाबतही अजून काहीही माहिती समोर आलेली नाही.
Two teachers and a tutor were arrested. Police custody remand of all three has been taken, they will be questioned: Delhi Police Joint CP Crime Branch on #CBSEPaperLeak case pic.twitter.com/mRs6Tvfj2A
— ANI (@ANI) April 1, 2018
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त आलोक कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेपरफुटीप्रकरणातील आजपर्यंतचा तपशील माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, सध्या पोलिसांचे दोन पथक बनवण्यात आले असून गणित आणि अर्थशास्त्राच्या पेपरफुटीप्रकरणी विविध ठिकाणी तपास सुरू आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका शाळेच्या दोन शिक्षकांबरोबर रोहित आणि ऋषभ शिवाय कोचिंग सेंटरचा एक शिक्षक तौकिर यालाही अटक करण्यात आले आहे.
पोलिसांच्या मते या दोन्ही शिक्षकांनी अर्थशास्त्राचा पेपर सुरू होण्यापूर्वी ३० ते ४० मिनिटांपूर्वीच उत्तरपत्रिकांचा गठ्ठा उघडला आणि त्याचे छायाचित्र तौकिरला पाठवले. तौकिरने हे छायाचित्र आपल्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून दिले. अशा पद्धतीने अर्थशास्त्राचा पेपर लीक झाला. पेपरफुटीचा फायदा घेणाऱ्या एका मुलाची चौकशी आणि व्हॉट्सअप ग्रुपमधील संदेशांचा तपास करत पोलीस तौकिरपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2018 8:13 pm