नवी दिल्ली : सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी मित्राला मदत करण्यासाठी तसंच पैशाच्या हव्यासापोटी पेपर फोडल्याचं कबूल केलं आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ, रोहित आणि तौकिर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. या प्रकरणात तौकिर तिसरा आरोपी आहे. ऋषभ आणि रोहित हे दोघं शिक्षक असून तौकिर खासगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षक आहे. तौकिरने रोहित आणि ऋषभ यांना आपल्याकडे शिकणा-या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी 12 वीचा अर्थशास्त्राचा पेपर मिळवण्यास सांगितलं होतं, त्याच्या सांगण्यावरूनच त्या दोघांनी पेपर फोडल्याची माहिती आहे. हे तिघं दोन आठवड्यांपासून पेपर फोडण्याचा कट आखत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

केवळ काही हजार रूपयांसाठी पेपर फोडण्यात आल्याचं प्रकरणाची चौकशी करणा-या अधिका-यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होण्याआधी 45 मिनिटं म्हणजे 9 वाजून 45 मिनिटांनी पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, परीक्षा 10.30 वाजता सुरू होते. पण शाळा प्रशासनाने शिक्षकांना 9 वाजून 10 मिनिटांनीच प्रश्नपत्रिका दिली होती असा आरोप आहे. त्यामुळे ऋषभ आणि रोहितने फोटो काढून प्रश्नपत्रिका तौकिरला पाठवली आणि त्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नपत्रिका फोडली असा आरोप आहे.

या तिघांनी केवळ हाच पेपर फोडला होता की यापूर्वीही पेपर फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे याबाबत पोलीस सध्या चौकशी करत आहेत. ऋषभ याच शाळेमध्ये फिजिक्सचा शिक्षक आहे तर रोहित गणिताचा शिक्षक. तौकिर खासगी कोचिंग क्लासमध्ये अर्थशास्त्र शिकवतो. हे तिघं दोन आठवड्यांपासून पेपर फोडण्याचा कट आखत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सीबीएसईचा 12 वी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. मात्र 10 वी गणिताच्या पेपरबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.