18 February 2019

News Flash

हरियाणात CBSE टॉपरवर सामूहिक बलात्कार, राष्ट्रपतींकडून झाला होता सन्मान

तरुणी बेशुद्द होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करण्यात आला, नंतर तिला बस स्टॅण्डवर सोडून आरोपींनी पळ काढला

( प्रतिकात्मक छायाचित्र )

हरियाणामध्ये सीबीएसई टॉपरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोप आहे की, रेवाडी जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणी बेशुद्द होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. नंतर तिला बस स्टॅण्डवर सोडून आरोपींनी पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कोचिंगसाठी जात असताना ही घटना घडली. तरुणी कोचिंगसाठी जात असताना कारमधून आलेल्या दोन आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि एका शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी आधीच शेतात थांबला होता. त्यानेही तरुणीवर बलात्कार केला. सर्व आरोपी आपल्याच गावातील असल्याचं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे.

पीडित तरुणीने घरी पोहोचल्यानंतर कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आरोपींनी धमकावल्यानंतर आपण एका पोलीस ठाण्यापासून दुसऱ्या पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल होईल या अपेक्षेने धावत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावत झीरो एफआयआर दाखल करुन घेतला असल्याचं सांगत आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे की, तरुणी सीबीएसईमध्ये २०१५ रोजी हरियाणा विभागात पहिली आली होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. सध्या ती पुढील शिक्षण घेत होती.

First Published on September 14, 2018 10:55 am

Web Title: cbse topper gangraped in haryana