मुंबई विद्यापिठामध्ये पेपरच्या गुण पडताळणीत होणारे घोळ आता काही नवीन राहिले नाहीत. म्हणजे पासचा नापास आणि नापासचा पास होईपर्यंतचा बदल गुण पडताळणीमध्ये होतो हे अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे. मात्र आता या गुण पडताळणीच्या हिशेबाबाहरेची गोंधळाची प्रकरणे थेट केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडून (सीबीएसई) होऊ लागली आहे. त्यामुळेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आला.

मिनाक्षी नावाच्या विद्यार्थीनीने आपला इंग्रजीचा पेपर गुणपडताळणीसाठी दिला असता तिचे मार्क चक्क ४०० टक्क्यांनी वाढले. म्हणजेच १६ मार्क मिळवून नापास झालेल्या मिनाक्षीला गुणपडताळणीनंतर थेट ८० मार्क मिळाले. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मिनाक्षी म्हणाली की, ‘इंग्रजी सारख्या विषयात नापास होणे दूरच राहिले पण मला या आधी कधी ८०च्या खाली मार्क्स पडले नव्हते. त्यामुळेच मी पेपर गुणपडताळणीसाठी टाकला. त्यावेळी पेपर तपासणाऱ्यांनी ६४ मार्क मोजलेच नसल्याचे लक्षात आले आणि म्हणून मला केवळ १६ मार्क देण्यात आले होते’

मिनाक्षी अशी एकमेव मुलगी नाही. यंदा निकाल लागल्यानंतर सीबीएसईकडे गुणपडताळणीसाठी चक्क दहा हजारहून अधिक अर्ज आले आहेत. मागील वर्षी असाच घोळ झाल्याने यंदापासून प्रत्येक उत्तरपत्रिकेतील मार्कांची पडताळणीसाठी दोन शिक्षकांचा एक गट अशापद्धतीने नेमणूक कऱण्यात आलेली. मात्र त्याचा विशेष काहीच फरक निकालांवर पडलेला नाही. मिनाक्षीसारखे आणखीन एक उदाहरण द्याचे झाले तर बारावीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या अमितचं देता येईल. सर्व विषयांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अमितला भूगोलात केवळ ४४ गुण होते. त्याने भूगोल विषयाचा पेपर गुणपडताळणीसाठी दिला असता त्याचे ५१ गुण वाढले आणि त्याला भूगोलामध्ये ९५ मार्क मिळाले. आणखीन काही उदाहरणे द्यायची झाली तर समाजशास्त्र विषयात १२ गुण मिळाल्याने नापास झालेल्या दहावीच्या क्रिशने गुणपडताळणीसाठी अर्ज केला आणि त्याचे एकूण गुण १२ वरून थेट ५९ झाले. त्याहून धक्कादायक म्हणजे दहावीच्या एका विद्यार्थ्याला उर्दूमध्ये चक्क शून्य गुण देण्यात आले होते. गुणपडताळणीनंतर तो उर्दू या विषयात ३९ गुणांसहीत उत्तीर्ण झाला.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयामार्फत गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही सीबीएसईकडून होणाऱ्या एकूण गुणांच्या बेरजेसंदर्भातील चुकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सर्व पानांवरील मार्कांची बेरीज करताना शिक्षकांकडून चूक होत असेल असे मत परिक्षा निरिक्षकांनी नोंदवले आहे. मात्र अशाप्रकारे चुकीचे मार्क देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळले जात असल्याचे आरोप पालकांनी केला आहे.